5 August 2012 at 00:41
धो
धो कोसळणारा पाऊस . . चिखल आणि चिकट माणसं यातून सावरत स्टेशन गाठावं . .
.आणि न चुकता दिसतात ते भारतीय अर्थसंकल्पाच्या फसलेल्या अहवालाचे विराट
दर्शन घडवणारे भिकारी . एखादी बाई आणि पाठीवर मूल , हात किंवा पाय तुटलेला
मुलगा , बुब्बुळ हरवलेल्या खोबण्या घेऊन फिरणाऱ्या भिकाऱ्यांच्या जोड्या
. का कुणास ठाऊक लहानपणापासून भिकारी ही मला शिवीच वाटत आलीय . आणि आजही
"तो भिकारी" असे बोलताना जीभ अडखळते आणि "तो माणूस" हेच शब्द तोँडावाटे
बाहेर पडतात .
ट्रेनची वाट बघत उभं रहावं आणि लक्ष जावं एखाद्या भिकाऱ्याच्या
मुलीकडे . खूप गोंडस हसणारी (हसू शकतात ती गोँडस) , डोळ्यात बालमनाची चमक ,
अगदी सहज लक्ष वेधून घेणारी ती . लाडात येऊन हलकेच आपल्या तेवढ्याच
काळवंडलेल्या आणि सुकून गेलेल्या आईचा पापा घेऊन डोळे मिचकावत बघते
तिच्याकडे . अन आपल्याही चेहऱ्यावर आपल्या नकळत कौतुकमिश्रित हसु उमलतं
(चूक करतो का आपण ?). आणि अगदी पुढच्या क्षणाला आई तिला हळूच काहीतरी
सांगते आणि तेच मूल हात पसरत आपल्यासमोर उभं राहातं . डोळ्यातली तीच चमक
शोधत आपण स्तब्ध . मातृत्वाची अशी कोणती अगतिकता असावी की आपल्या पोटच्या
गोळ्याला असं दीनवाणं करत फरफटत नेते ती ? (ती बाई त्या मुलीची आई नसेलही ,
पण एखाद्या लहान मुलाचं आपल्याशी आईसारखं वागणं हेच मातृत्व प्रदान करायला
पुरेसं असावं) रेल्वे स्टेशनवर वाढलेली पोसलेली , ट्रेनच्या गतीशी स्पर्धा
करायला सरावलेलं त्यांचं शरीर . . .पण धाव मात्र फक्त भीक मागण्यापुरती . .
.
नवीन वर्ष , पहिला दिवस , सरावाने आपली झालेली खुर्ची आणि टेबल गाठावं ,
मनातल्या मनात कामाची आखणी आणि आपल्याच तंद्रीत असताना अतिशय दबलेल्या
आवाजात कुणीतरी विचारावं "मॅडम चहा ?" पंधरा- सोळा वर्षाँचा मुलगा .
दारिद्र्याच्या सर्व खुणा अंगावर बाळगणारा . आणि त्या खूणा अधिकच ठसठशीत
दिसाव्यात म्हणून की काय कॅँटीन काँट्रॅक्टर ने दिलेला तितकाच मळकट
युनिफॉर्म . दबलेला प्रश्न आणि आपण म्हणावं "दे चहा" . मग हा होऊन गेलेला
नित्यनियम . हो - ना एवढा संवाद . पण डोळ्यात सच्चेपणा . सर्व उच्चभ्रू सधन
लोकांच्या त्या गर्दीत परिस्थितीच रडगाणं न गाणारा तो एकमेव . कोणतंही काम
करण्याची तयारी . चहा देताना फक्त कपच नाही तर नजरही आदराने ओतप्रोत
भरलेली . वर्षाअखेरीस आपल्याला वाटतं प्रामाणिक आहे मुलगा शिकला पाहिजे .
नवीन वर्ष , पहिला दिवस . सही करण्यासठी ऑफिसमध्ये जावे , तर हसतमुखाने
पेन समोर धरणारा . "मॅडम मला काम मिळालय इथे शिपायाचं कार्यालयात." "अरे
वा !" आनंद चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा . हळूहळू कामाची सवय झालेली . एखाद
दिवशी आपण जेवणाचा डब्बा विसळण्यासाठी उठावे तर लगबगीने त्याने म्हणावे
"मी देतो घासून " आणि आपण म्हणावे , "ज्या कामासाठी नेमणूक झालीय ते कर असं
केलस तर काही दिवसांनी तुला सर्वाँचीच कामं करावी लागतील ." फार काही कळलं
नसावं त्याला पण कुणाची वैयक्तिक कामं करू नयेत एवढं कळलं असावं . म्हणून
त्याने एखाद्या व्यक्तीचे काम करण्यास नकार द्यावा आणी दुसऱ्या दिवशी
हिरमुसल्या चेहऱ्याने काम करताना दिसावा . मग कळतं आपल्याला "काम करण्याचा
नकार - केबिनमध्ये गेलेली तक्रार - अन झालेली कान उघडणी"
आता तो सतत दिसतो चहाचे कप विसळताना , पाण्याचे ग्लास भरुन देताना .
आपण हट्टाने त्याला म्हणावं "तू हे करु नयेस असं वाटतं मला . सरळ नकार न
देता या वेळेत ईथे येणं टाळु शकतोस ना तू ." आणि पुढून पटकन प्रश्न यावा
"आपण सगळे फक्त लाचारच नाही तर भिकारीही असतो . जगणं खूप कठीण आहे मॅडम"
अनुभवाचे कोणते टप्पे पार केल्यावर तो असं बोलला माहीत नाही . पण "मॅडम चहा
?" असा हसून प्रश्न विचारणारे नितळ डोळे शोधत आपण स्तब्ध .
भिकाऱ्यांना आत्मसन्मान नसतोच मुळी म्हणून पहिलं मूल आपल्याला एकदाच
हेलावून टाकतं . पण कष्टाने घेतलेलं शिक्षण निश्चितच आत्मसन्मानाची भावना
रुजवतं . (बाळा आता कॉलेजमध्ये शिकतोय .) पण सन्मानानं जगण्याच्या धडपडीत
आत्मा किती उरतो हे फक्त पहायचं . कारण आपल्या जगण्याच्या सर्व तत्वांचा
आपल्या डोळ्यांदेखत सहज पराभ करीत "बाळकृष्ण" जगत असतो . हे क्षणभराचं
हेलावणं नाही आत्म्याचं कण कण जळणं आहे .
No comments:
Post a Comment