मी तुझ्या काही सरी या
बंधूनी घेते उशाला
घनघोरही आश्वस्त आहे
या तमाचे भय कशाला
ते उभे आकाश आहे
मातीत उगवून माखलेले
चातकाचे एक गाणे
अस्वस्थसे ओघळलेले
व्यर्थ काटे तोडीते ती
काट्याविना हे रान नाही
काय सांगू बाभळीला
तुज अंगणाचे दान नाही ?
स्वप्नातले रेखाटले मी
चित्र हे जागेपणी
हरेक रेघ बोलते की
मौन बाळगते कुणी?
पाय हे अंधारलेले
अन स्मृतींचे ऊन झाले
कोरड्या डोळ्यात माझ्या
गाव ओले ... निजलेले