आपल्याला कवितेतलं कळतं
थोडंफार
हा भ्रम आयुष्यभर पुरतो
कळते - नकळतेपणाच्या
प्रदीर्घ प्रदीप्त आवर्तनामध्ये
डोळ्यांना चटकन दिसावी एखादी जादू...
अथवा मनाला चटका देऊन जाणारी
एखादी धग
धुमसत राहावी विझू विझू अंगाच्या चुलीत
तशी असावी ती...
"फुलपाखराची साद,..
धुमसतं स्मशान...
ध्यानस्त योगी...
अन निळाई ने उसने दिलेले अवसान
कपारीतील लाल पाण्याचे ओहोळ
उडवीत चाललेले अनवाणी पाय
ऊर्जा अक्षय्यतेला स्मरून
वीज कडाडल्यावर आडवी पडलेली पहार
पावशा गो ची हाक जी ठरे वेडी ठार
अंगणाचे गाणे... गाण्यातील घरघर
रात्रीने चरत खाऊन टाकलेले ... एका पावसाचे घर "
असे कधीही स्पष्ट न झालेले संदर्भ घेऊन ,
ती उभी ठाकते माझ्यासमोर ..
तिच्या तळहाताच्या पेटीत हळुवार जपलेले निखारे
त्यांची धग पसरत जाते अंगभर
माझ्या असण्यातील माझे नसलेपण
ती हलकेच जोजवते ...
आणि मला कवितेतल
कळतं थोडंफार
हा भ्रम आयुष्यभर पुरतो